
थेट WhatsApp वर मिळवा
देशात गव्हाच्या दरांनी प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री वाढवण्याच्या तयारीत आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १९ नोव्हेंबर : देशातील बाजारपेठेत गव्हाच्या किमतींनी प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला महागाईची झळ बसत आहे. ही दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच खुल्या बाजारात गव्हाची विक्री वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) माध्यमातून खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (ओएमएसएस) अधिक प्रमाणात गहू उपलब्ध करून देण्याबाबत सरकार स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरकारी गोदामांत विक्रमी साठा, तरीही भाववाढ कायम
भारतीय अन्न महामंडळाच्या आकडेवारीनुसार, १ नोव्हेंबरपर्यंत सरकारी गोदामांमध्ये ४४७.५८ लाख टन गव्हाचा विक्रमी साठा उपलब्ध आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला सरकारी साठ्याने गाठलेली ही आजवरची सर्वोच्च पातळी असून, यापूर्वी २०२१ मध्ये सुमारे ४२० लाख टन साठा नोंदवला गेला होता. सप्टेंबरमध्ये ४७९.९२ लाख टन आणि ऑक्टोबरमध्ये ४६३.१६ लाख टन साठा शिल्लक असतानाही बाजारातील दरांवर नियंत्रण आलेले नाही. दिल्लीच्या घाऊक बाजारात अवघ्या पाच दिवसांत गव्हाचे दर २ हजार ९४५ रुपयांवरून ३ हजार ४० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.
पेरणी क्षेत्रातील घटीमुळे सरकारसमोर दुहेरी आव्हान
यंदा देशातील गव्हाच्या पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत देशभरात ५०.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी पूर्ण झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ५९.१ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. गव्हाच्या लागवड क्षेत्रात सुमारे १५.२७ टक्क्यांची घट झाल्यामुळे भविष्यातील उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे पेरणीची स्थिती आणि हवामानाचा अंदाज घेऊनच सरकार खुल्या बाजारात गहू उतरवण्याचा अंतिम निर्णय घेणार आहे.





