गोडोली चौकाने अखेर घेतला मोकळा श्वास – अतिक्रमण हटाव विभाग पुन्हा ॲक्शन मोडवर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । सातारा । सातारा शहराच्या पूर्वेला असणाऱ्या गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय व गोडोली जकात नाका परिसर यादरम्यानच्या अतिक्रमणांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटाव विभागाने या कारवाईमध्ये पाच टपर्‍या आणि तीन हातगाड्या उचलून येथील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. यावेळी कारवाई करताना पालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली मात्र पोलिस बंदोबस्तामुळे फार कटू प्रसंग घडला नाही.

मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशानुसार सातारा शहरातील अतिक्रमणे हटवण्याचे अतिक्रमण विभागाने मनावर घेतले आहे. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी जेसीबी दोन टिपर 20 कर्मचारी आणि स्वतः पालिका अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी गोडोली चौकामध्ये बुधवारी सकाळी तळ दिला कारवाई होणार हे समजताच विक्रेते आणि पालिकेचे कर्मचारी आमने-सामने आले. पहिल्या कारवाईच्या दरम्यान एक टपरी उचलताच टपरी चालकाने थेट जेसीबीवर चढून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंत्रणेने त्याला भीक घातली नाही. दोन-तीन टपऱ्या उचलून थेट टिप्परमध्ये टाकण्यात आल्याने विरोध करणारे मागे हटले. यावेळी पोलिस बंदोबस्त खूप होता कारवाई दरम्यान काही राजकीय फोना-फोनी ला सुरुवात झाल्याने कारवाई बारगळते की काय अशी चर्चा सुरू झाली होती, मात्र तब्बल चार तास सुरू असलेल्या या कारवाईमध्ये अतिक्रमण हटाव विभाग जागचा हलला नाही.

टपऱ्या आणि हातगाडी हटवले गेल्यामुळे गोडोली मंदिर परिसर कोपरा ते देशमुख क्लिनिक पर्यंतचा रस्ता मोकळा झाला येथील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने वाहतुकीला रस्ता मोकळा झाला. गोडोली जकात नाका परिसरातील पान टपऱ्या हटविण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत प्रशांत निकम हे गोडोलीतच ठाण मांडून होते. काही किरकोळ भाजी विक्रेत्यांना सुद्धा सायंकाळी चौकातून हटवण्यात आले. रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या चुकीच्या पद्धतीने सुरू झालेल्या रिक्षा थांब्यावरसुद्धा तक्रार नोंदविण्यात आली होती. चौकात विनाकारण गर्दी करणाऱ्यांना थांबण्यास मनाई करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!