फडणवीसांना सत्ता द्या मी आरक्षण मिळवून देतो; खासदार उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषदेत ग्वाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.२९: देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग नाही. आधीच्या प्रश्नावर त्यांनी आधी उत्तरं द्यावी. मार्ग निघणार असेल तर चर्चा करावी, असं देखील ते म्हणाले. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदयनराजे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आपल्याच वयाचे आहे. त्यांनी आरक्षणासाठी काम केलं. ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. आता तुम्ही सत्तेत आहात ना मग काम करा ना, असंही ते म्हणाले.

उदयनराजे म्हणाले की, जिल्हा न्यायालयातही तारीख देतात. मग सुप्रीम कोर्टाने तारीख दिली नाही. राज्य शासनाचा वकील हजर राहात नाही, असा आरोपही त्यांनी केला. इतरांना जसे आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं उदयनराजे म्हणाले.

आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. कुणाचं नाव घेऊन मी कुणाला मोठं करणार नाही. कारण याला सगळेच जबाबदार आहेत. लोकं यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असंही उदयनराजे म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला तर त्याला हीच लोकं जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आता कुबट वास यायला लागला आहे. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवायचा आणि एखाद्या समाजाला दाबायच काम केलं जात आहे. मराठा समाजात जन्माला आलो असलो तरी छत्रपतींच्या विचाराने चालतो. ते सर्व धर्माला सोबत घेऊन चालायचे. आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, असं ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळं होणार, झालं असं आश्वासन दिलं जातं. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दात त्यांनी आरोप केला आहे.

ते म्हणाले की, या प्रश्नाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण निर्णय मार्गी लागणार नाही. आता पुढची पिढी विचारेल तुम्ही काय केले? प्रत्येकाला आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का विचार केला नाही असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की, इतरांचं आरक्षण कमी करून आम्ही आरक्षण मागत नाही. सर्वधर्म समभाव अशी भूमिका छत्रपतींची आहे. आता जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार खासदारांची नैतिकता आहे हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असं ते म्हणाले. इतर कुठल्याही समाजावर अन्याय झाला तरी आम्ही त्यांचीही बाजू तितक्याच तीव्रतेने मांडू, असंही ते म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!