गीर वंशाचे वळू ब्राझीलमधून आयात करणार – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार


स्थैर्य, मुंबई, दि. १७: राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्या सहकार्याने ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे 10 वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

पशुसंवर्धनमंत्री श्री.केदार म्हणाले, प्रसिद्ध करावयाच्या निविदांचे सर्व अत्यावश्यक प्रारुप राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांना उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये ब्राझीलमधून या वळूंची आयात करण्यापूर्वी केंद्र शासनाच्या सर्व आवश्यक निकषाप्रमाणे सर्व रोगमुक्त असल्याबाबतच्या, तपासण्या वंशावळीची खातरजमा (डीएनए तपासणीद्वारे) करुन खरेदी करण्यात येणार आहे. वळूच्या मातेचे दूध 10 हजार किलो प्रति वेत पेक्षा जास्त आहे असे गीर वळू आयात करण्यात येणार आहेत.

गीर वळूपासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गीर प्रजातीचे पैदासीद्वारे शेतकऱ्यांचे व पर्यायाने राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

डिसेंबर 2021 पूर्वी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कृतिबंध आराखडा तयार करुन वळूंची आयात करून प्रक्षेत्रवर करण्यात यावेत अशा सूचना श्री केदार यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत विदर्भातील नाविन्यपूर्ण व विशेष घटक शेळी गट वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. सानेन शेळी आयात करणेसंदर्भात एजन्सीकडून माहिती घेण्यात आली. नागपूर येथील मदर डेअरीमार्फत कार्यरत दूध प्रक्रिया व दूध भुकटी प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यात दूध भुकटी प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना श्री.केदार यांनी दिल्या.

या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे प्रतिनिधी श्री गुप्ता, श्री हातेकर, पशुसंवर्धन विभागाचे सह सचिव मानिक गुट्टे, उपायुक्त धनंजय परकाळे, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त तुंबाड, उपसचिव श्री.गोविल, अवर सचिव श्री.केंडे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!