विडणीत गणेशोत्सवाचा उत्साह; भारूड, कीर्तन, ‘खेळ पैठणीचा’ सह विविध कार्यक्रमांची रेलचेल

ग्रामपंचायत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संयुक्त उपक्रम; २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान रंगणार सोहळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, विडणी, दि. २२ ऑगस्ट : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विडणी (ता. फलटण) येथील ग्रामपंचायत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत हे कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार असून, सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार, दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता राजाळे येथील सुप्रसिद्ध ‘जानाई सांप्रदायिक भारूड मंडळा’च्या कार्यक्रमाने होणार आहे. शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

शनिवार, दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता महिलांसाठी विशेष आकर्षण असलेला ‘वैनायक विमानाने खेळ पैठणीचा’ हा गायन व नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महिलांसाठी पैठणी साडी, सोन्याची नथ आणि चांदीची जोडवी अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता महिलांसाठी ‘सौभाग्यवान लेणं लुटा’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता महाआरती आणि लहान मुला-मुलींसाठी आकर्षक बक्षीस वाटपाचा कार्यक्रम पार पडेल. रात्री ९ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विडणीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!