दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
गणपती विसर्जनानंतर वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होणार्या नवरात्रोत्सवासाठी सध्या अनेक गणेश मंडळे सज्ज झाली आहेत.
नवरात्रोत्सव अवघ्या सहा दिवसांवर आला असल्याने कुंभारवाड्यात मूर्ती पाहण्यासाठी व ठरवण्यासाठी मंडळाची गर्दी होत आहे. यावर्षी पाच फूट ते वीस फुटांपर्यंत अंबामातेच्या मूर्ती उपलब्ध आहेत. याची किंमत पाच हजार रुपये ते वीस हजार रुपयांपर्यंत आहे. रंग कारागिरांची मजुरी, कच्चामाल यामुळे मूर्तींच्या किमतीत वाढ होत असल्याचे श्री. बाळासाहेब रघुनाथ कुंभार यांनी सांगितले.
विविध रूपात सध्या देवी बनवण्याचे काम सुरू आहे. काळुबाई, अंबामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी या मूर्तींना मंडळांकडून मागणी आहे.