
दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। बारामती । सध्या शस्त्र संधी झाली असली तरी आगामी काळात कधीही युद्ध होऊ शकते. अशा वेळी बारामती तालुक्यातील अनेक माजी सैनिक सरकारच्या मागणीनुसार सीमेवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन बारामती तालुका जय जवान आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी केले.
जय जवान आजी माजी सैनिक संघटनेची बैठक झाली. या बैठकीत अनुभवाचा फायदा घेऊन सीमेवर लढण्यासाठी जाण्याचा एकमताने ठराव करण्यात आला.
सध्या शस्त्रसंधी झाली असली तरी पाकीस्तानवर कोणत्याही प्रकारचा विश्वास नसल्याने वेळप्रसंगी सरकारला सैनिकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासल्यास भारतीय सैनिकांना दुसर्या फळीत सर्व प्रकारची मदत करू, यावर विषयी बैठकीत सर्वांचे एकमत झाले. शासनाकडे सीमेवर जाण्यासाठी इच्छुकांची यादी देण्यात आली.
सध्याच्या वयातही माजी सैनिक संसार, मुले, नातवंडे व्यवसाय, नोकरी आदींचा त्याग करून सीमेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. हेच खरे भारत मातेबद्दलचे देशप्रेम होय. यावेळी ‘भारत माता की जय, जय जवान, जय किसान’ च्या घोषणा देत बैठकीची सांगता करण्यात आली. बैठकीस बारामती तालुक्यातील सर्व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.