
दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। बारामती । येथील इस्कॉन मंदिरात नृसिंह जयंती उत्सव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आध्यात्मिकतेबरोबरच देशसेवेचाही अनुपम संगम अनुभवायला मिळाला. पाकिस्तान विरोधी युद्धात केलेल्या कामगिरीसाठी भारतीय जवानांकरीता विशेष प्रार्थना करण्यात आली.
डॉ. युवराज भोसले यांनी भक्ती, धैर्य आणि परमेश्वराच्या संरक्षणाच्या भावनेवर आधारित नृसिंह अवताराचे उद्दिष्ट भक्तांपुढे सांगितले.
श्रीमान युवराज हरी प्रभूंनी कथेतून नरसिंह भगवंतांच्या लीलांचे प्रभावी आणि हृदयस्पर्शी विवेचन करत भक्तांना भगवंतांच्या अनंत सामर्थ्याची जाणीव करून दिली. भगवान श्रीकृष्णांचा नृसिंह अवतार अधर्माचा नाश करण्यासाठी आणि भक्त प्रल्हादांचे रक्षण करण्यासाठी झाला. अहंकारी राक्षस हिरण्यकशिपूला मारण्यासाठी त्यांनी हे रूप धारण केले. या अवतारातून भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण, अहंकाराचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना हे मुख्य उद्दिष्ट होते. भगवंत हे भक्तांचे सदैव रक्षण करतात आणि सत्य व धर्माचा नेहमी विजय होतो. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यवस्थापन प्रमुख श्रीमान नंददुलाल प्रभू म्हणाले, उत्सवाचा उद्देश केवळ धार्मिकता जपणे नसून समाजात अध्यात्म आणि शांतीचा संदेश पोहोचवणे हा आहे.
यावेळी नृसिंह कवच पठण, अभिषेक, कथा, कीर्तन, नाटिका सादरीकरण, आणि आरती अशा विविध कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला. मंदिर परिसरात एकतेचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा सुंदर संगम पहावयास मिळाला.