फलटणमध्ये राजे गटाला खिंडार

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक व पंचायत समिती सदस्यांचा भाजपात प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. 11 एप्रिल 2024 | फलटण | फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या अनेक दिग्गज माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने राजे गटाला मोठे खिंडार पडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज फलटण दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत राजे गटातील माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

फलटण येथील माजी नगराध्यक्ष असलेले राजे गटातील दिलीपसिंह भोसले यांचे सुपुत्र तथा महाराजा मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष रणजितसिंह भोसले, माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार अजय माळवे, माजी नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे यांचे पती सुधीर अहिवळे, श्रीराम कारखान्याचे संचालक शरद रणदिवे, फलटण येथील प्रसिद्ध विधीज्ञ संदीप लोंढे, माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, संजय सोडमिसे, सागर कांबळे, माजी सरपंच धनंजय मोरे, युवा उद्योजक संदीप चोरमले, डॉ. सूर्यकांत दोशी यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.


Back to top button
Don`t copy text!