वणवा लावल्या प्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षिकेला प्रत्येकी पाच हजार रुपये दंड


स्थैर्य,वाई, दि.२१: वणवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे (ता. वाई) येथील जिल्हा परिषदे शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षिकेला प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा वाई न्यायालयाने आज सुनावली.

शिवाजी लक्ष्मण पार्टे (रा. वेलंग, ता. वाई) व नलिनी गणेश खरात (रा. शिरगाव, ता. वाई) अशी संशयितांची नावे आहेत. पार्टे हे मुख्याध्यापक तर खरात शिक्षिका म्हणुन काम करतात. रेनावळे येथील राखीव वनक्षेत्रास 26 फेब्रुवारी 2021 रोजी वनवा लागला होता. वनाधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रमपुर्वक हा वनवा विझवला होता. शिवाजी पारटे व निलीमा खरात यांनी रेनावळे गावातील शाळेजवळ कचरा व कागद पेटवून दिले होते. या कच-यातील कागद व पालापाचोळा वार्‍याने उडून शेजारच्या मालकी क्षेत्रात पडल्याने तेथील गवताने पेट घेतला. ही आग जवळच्या वनक्षेत्रात पसरली. या आगित वनक्षेत्रातील 22 हेक्टर वनक्षेत्र जळून शासनाचे 11 हजार रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम व प्रभारी वनपाल रत्नकांत सिताराम शिंदे यांनी केला. आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. वन गुन्ह्यातील दोन्ही संशयितांनी वाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.आर. माळी यांच्यासमोर गुन्हा कबुल केला. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी 5 हजार रुपये दंड व दंड न भरलेस 20 दिवसांची साधी कैद ही शिक्षा सुनावली. आरोपींनी एकूण 10 हजार रुपये दंड न्यायालयात भरला. सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!