वर्षभरानंतर चौपाटी पुन्हा गांधी मैदानावर, खा. उदयनराजेंचा आदेशाने गाडेधारकांना दिलासा : अस्वच्छता दिसल्यास चौपाटी बंद करण्याचा इशारा


स्थैर्य,सातारा, दि.२१: तब्बल वर्षभरानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानंतर राजवाड्यासमोरील चौपाटी आळूच्या खड्डयातून मूळ जागी स्थलांतरीत होत आहे. विक्रेत्यांनी उदयनराजे यांची जलमंदिर येथे भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, चौपाटी सुरू करण्यापूर्वी उदयनराजे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक गाडा एक मालक, स्वच्छता टापटीप आणि योग्य सामाईक अंतर राखण्याच्या सूचना चौपाटी विक्रेत्यांना दिल्या आहेत. अस्वच्छता दिसल्यास चौपाटी पुन्हा बंद करण्याचा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

कोरोनाचा सातार्‍यात उद्रेक झाल्यानंतर एक वर्षापूर्वी चौपाटी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानंतर लागू झालेल्या लॉक डाऊनमुळे चौपाटीवरील विक्रेत्यांचे आर्थिक गणित पूर्णतः विस्कटले. तब्बल आठ महिने एकशे वीस गाडेधारकांना यामुळे उपासमारीची वेळ आली होती. गांधी मैदानावरील चौपाटी बंद करून विक्रेत्यांना आळूचा खड्डा येथे पुनर्वसन देण्यात आले होते. मात्र, याठिकाणी व्यवसाय कमी होत होता.

]दरम्यान, पन्नास विक्रेत्यांनी शनिवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांची जल मंदिर येथे भेट घेतली. आळूचा खड्डा येथे सुविधांचा अभाव आणि अस्वच्छता यामुळे व्यवसाय होत नसल्याची अडचण विक्रेत्यांनी मांडली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे उपस्थित होते. विक्रेत्यांशी चर्चा करून उदयनराजे यांनी गांधी मैदानावर पुन्हा चौपाटी सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, प्रत्येकाचा एकच गाडा, पुरेसे सामाईक अंतर, टापटीप आणि स्वच्छता या अटींवर चौपाटी सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्टपणे बजावले. चौपाटीवर घाण दिसल्यास ती बंद करण्याचा आदेश उदयनराजे यांनी दिला. पालिका प्रशासनाने मात्र या संदर्भात चुप्पी साधली आहे. चौपाटी सुरू करण्याचा आदेश हा खासदार उदयनराजे भोसले यांचा आहे, मात्र मुख्याधिकार्‍यांकडून आम्हाला कोणताही आदेश नसल्याचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी सांगितले.

चौपाटीवर व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांना खबरदारी म्हणून आरटीपीसी आर चाचणी करावी लागणार आहे. करोना प्रतिबंधात्मक उपायांचे कठोरपणे पालन करावे लागणार अन्यथा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले. या चौपाटीवरील विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून सक्तीने मास्कचा वापर करावयाचा आहे.


Back to top button
Don`t copy text!