कापडगाव (ता. फलटण) येथे वीज पडून ५ शेळ्यांचा मृत्यू; प्रशासनाकडून पंचनामा पूर्ण, मदतीची कार्यवाही सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण तालुक्यातील कापडगाव येथे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून गनी कच्छी यांच्या ५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून संयुक्त पंचनामा व शवविच्छेदन पूर्ण झाले असून, शासकीय मदतीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ४ एप्रिल : फलटण तालुक्यात अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने थैमान घातले असून, शेतीपिकांबरोबरच आता पशुधनाचेही मोठे नुकसान होत आहे. काल (शुक्रवारी) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मौजे कापडगाव (ता. फलटण) येथे अचानक वीज कोसळून श्री. गनी कच्छी यांच्या तब्बल ५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या नैसर्गिक संकटामुळे गरीब पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. काल रात्री कापडगाव परिसरात असाच वादळी पाऊस सुरू असताना गनी कच्छी यांच्या शेळ्यांवर काळाने घाला घातला. वीज थेट अंगावर पडल्याने पाचही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रशासनाकडून तत्पर कार्यवाही:

या घटनेची माहिती मिळताच महसूल आणि पशुवैद्यकीय विभागाने तातडीने दखल घेतली. आज (शनिवारी) सकाळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा संयुक्त पंचनामा केला. तसेच, पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मृत शेळ्यांचे शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टेम) देखील पूर्ण करण्यात आले आहे.

अवकाळी पावसात मुक्या प्राण्यांचा बळी गेल्याने कापडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीत पशुधनाचे नुकसान झाल्याने, शासन नियमानुसार नुकसानग्रस्त पशुपालक गनी कच्छी यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!