मेट्रो-३ च्या आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२३ । मुंबई । मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो ३ चा हा टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशनद्वारे तयार करण्यात येत असलेल्या मेट्रो-३ च्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प ) सुबोध गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भुयारी मार्गातून चालत प्रकल्पाची पाहणी केली आणि कामाची संपूर्ण माहिती घेतली. मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे- सीप्झ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २,६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे. या मेट्रो -3 रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील असा विश्वास व्यक्त करून या मार्गाचा पहिला टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत, त्यांना विलंब होणार नाही. आरेचा कारशेडचा विषय मार्गी लागला आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी- कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!