राज्यातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२३ । नवी दिल्ली । महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण व जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या दोन बंदरांनी वर्ष 2022-23 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले.

येथील इंडिया इंटरनेशनल केंद्रामध्ये केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ‘हरित सागर’ ग्रीन पोर्ट मार्गदर्शक तत्त्वाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने देशभरातील 12 बंदरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, विभागाचे सचिव सुधांश पंत, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात देशभरातील प्रमुख बंदरांना आर्थ‍िक वर्ष 2022-23 या कालावधीत निवडक विविध परिचालन मापदंडांच्या (ऑपरेशनल पॅरामीटर्स) आणि त्यांच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल तसेच सर्वाधिक वाढीव सुधारणा नोंदविलेल्या बंदरांना सन्मानित करण्यात आले. वर्ष 2022-23 मधील त्यांच्या एकूण कामगिरीच्या आधारावर त्यांना क्रमवारी देण्यात आली. प्रमुख बंदरांमध्ये निष्पक्ष आणि निरोगी स्पर्धा निर्माण करणे आणि येत्या वर्षात त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्याची कल्पना या पुरस्कारामागची आहे. यामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या दोन बंदरांनीही उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले.

मुंबई बंदर प्राधिकरणाने वर्ष 2022-23 च्या एकूण कार्यप्रदर्शनात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी हा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल यांच्या हस्ते स्वीकारला. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला वर्ष 2022-23 च्या टर्न-अराउंड-टाइम (नॉन-कंटेनर पोर्ट) मध्ये परफॉर्मन्स शील्ड मिळाली. तसेच वर्ष 2022-23 च्या एकूण वार्षिक कामगिरीनूसार 6 क्रमांक प्राप्त झाला. यासाठी स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी, आणि उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यावतीने नितीन बोरवणकर, मुख्य व्यवस्थापक एमईसीएचएल इलेक्ट्रीकल इंजिनिअर एण्ड सीईओ एसईझेड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


Back to top button
Don`t copy text!