
राज्यात अन्न व औषध प्रशासनाने बेकायदेशीर औषध विक्रीविरोधात कठोर मोहीम राबवून ८८० आस्थापनांवर धडक कारवाई केली असून परवाने रद्द केले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. ०८ सप्टेंबर : राज्यभरात बनावट, दर्जाहीन औषधे आणि बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात प्रशासनाने तब्बल २,९०२ ठिकाणी छापे आणि तपासण्या टाकून ११ कोटी ४१ लाख रुपये मूल्याचा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली असून यामुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
८८० आस्थापनांवर कारवाई आणि ६७७ परवाने निलंबित
कारवाईदरम्यान एफडीएच्या पथकाने उत्पादन करणारे १४० आणि विक्री करणारे ७४० अशा एकूण ८८० आस्थापनांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी ६७७ परवाने निलंबित करण्यात आले असून २०३ आस्थापनांचे परवाने पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय १०४ ठिकाणी शोध मोहीम राबवून २० गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ जणांना अटक करण्यात आली आहे.
गंभीर त्रुटी आणि आरोग्याशी खेळ
तपासणीदरम्यान अनेक औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री, बिल न देणे, तसेच मुदतबाह्य औषधांची साठवणूक यांसारख्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत. सर्वात घातक म्हणजे इन्सुलिन आणि लशींसारख्या तापमानाबाबत संवेदनशील असलेल्या औषधांची चुकीच्या पद्धतीने केलेली साठवणूकही उघडकीस आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.