स्थैर्य, भुईंज, दि. ०३ : सुरूर येथे उड्डाणपुलानजिक झाडाखाली झोपलेल्या तिघांना उठवून धारदार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. जक्कल रंग्या काळे रा. बेघर वस्ती, सुरूर, ता. वाई असे संशयिताचे नाव आहे.याबाबत माहिती अशी, राजेंद्र दादाराम मोहिते वय 52, रा. सुरूर, प्रकाश हरिश्चंद्र क्षीरसागर, विश्वास जयसिंग बांदल हे दि. 28 रोजी दुपारी दीडच्या सुमारास सुरूर उड्डाण पुलाजवळील आंब्याच्या झाडाखाली झोपले होते. त्याठिकाणी जक्कल रंग्या काळे आला. त्याने मोहिते, क्षीरसागर बांदल यांना लाथा घालून उठवले. याचा जाब मोहिते यांनी विचारला असता जक्कल काळे याने कमरेला लपवून ठेवलेला सुरा राजेंद्र मोहिते यांच्या मानेवर मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोहिते यांच्यावर मानेवर जखम झाली. हा वार अडवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातावर व बोटावरही जखमा झाल्या आहेत. तसेच जक्कलने मोहिते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून हरिश्चंद्र क्षीरसागर आणि विश्वास जयसिंग बांदल यांनाही धमकावून त्यांच्या पायावर वार केले. याप्रकरणी मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जक्कल काळेवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय मोरे करत आहेत.