शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२३ । हिंगोली । परिसरातील शेतकऱ्यांनी गावातले पाणी गावात आणि शेतातले पाणी शेतात जिरवून जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविल्यास तो समृद्ध होईल, अन्नदाता शेतकरी उर्जादाता बनावा यासाठी आपला प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगोली येथे केले. विविध रस्ते प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

येथील रामलीला मैदान येथे वाशिम-पांगरे चौपदरी मार्ग प्रकल्पाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, सर्वश्री आमदार वसंत खंडेलवाल, विप्लव बाजोरिया, तानाजी मुटकुळे, लखन मलिक, संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या भागातला शेतकरी समृध्द झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. स्मार्ट शहरे नाही तर स्मार्ट गावे झाली पाहिजेत. तरुण मुलांना मुंबई-पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. यासाठी आपल्या जिल्ह्यात काम मिळाले पाहिजे. या भागाचा ग्रोथ रेट वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाशिम व हिंगोलीच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते करु, असे सांगून शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे असे ते म्हणाले.  शेतकरी उर्जादाता व्हावा यासाठी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिजेल, बायोसीएनजी इलेक्ट्रीक, हायड्रोजन यासारखे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी सुजलाम, सुफलाम होईल.

आपल्या भागात हळदीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. या भागात रस्त्याच्या बाजूने शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्यास ११०० कोटी रुपये खर्च करुन हळदीच्या कल्स्टरसाठी लॉजिस्टीक पार्क उभारण्यास १०० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. येथे हळदीपासून विविध उत्पादने निर्माण केल्यास आपली हळद जगाच्या नकाशावर येऊन साता समुद्रापलीकडे जाईल असा विश्वास दिला. सध्या जालना येथे एक्सपोर्ट-इम्पोर्ट सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

हिंगोली जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी जलसंवर्धनाची कामे झाली पाहिजेत. यात ब्रीज कम बंधारे झाले पाहिजेत. या माध्यमातून नदी, नाल्याचे खोलीकरण करुन गावातले पाणी गावात, घरातले पाणी घरात, शेतातले पाणी शेतात जिरले पाहिजे. तसेच नदी नाल्याचे खोलीकरण करुन पाणी साठवण क्षमता वाढवली पाहिजे. यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल. प्रशासनाने देखील जलसंवर्धनाच्या कामास प्राधान्य दिले पाहिजे.

मागील ८ वर्षात हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर एकूण १३ कामे मंजूर करण्यात आली असून यांची किंमत ५ हजार ५८७ कोटी रुपये आहे. यापैकी ६ कामे पूर्ण झाली असून ७ कामे प्रगतीपथावर आहेत. अपूर्ण कामे पुढच्या चार महिन्यात पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी दिला. आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील वाशिम ते पांगरे महामार्गाचे चौपदरीकरणाचे लोकार्पण होत आहे. याचा मला आनंद आहे. नामदेव महाराजाच्या जन्मस्थानी रस्ता करण्यासाठी सीआरएफमधून मंजूरी दिलेली आहे. मी दिलेले वचन पूर्ण झाले आहे. विशेषत: वाशिम हिंगोली जिल्ह्यामध्ये १३  कामे मंजूर होती. त्याची किंमत ६ हजार कोटी रुपये होती. त्याची ६ कामे पूर्ण झाली असून ७ कामे प्रगतीथावर आहेत. आज वाशिम ते पांगरे याचे चौपदीकरण झाल्याचा आनंद झाला आहे.

वाशिम ते पांगरे या मार्गामुळे नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. गेल्या आठ वर्षात ५० लाख कोटी रुपयाची कामे करण्याची संधी मिळाली आहे. वारंगा फाटा रस्त्याचे काम पुढच्या महिन्यात मी माहूरला रोपवे आणि त्याच्या सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी येईपर्यंत पूर्ण होतील. तसेच येथे जंक्शन तयार करण्याची सूचना दिलेली आहे. हिंगोलीचा बायपास मंजूर करण्यात आलेला आहे. इंदोर ते हैद्राबाद नवीन रस्ता मंजूर केलेला आहे. यामुळे हिंगोली व वाशिमला हैद्राबादसाठी चांगली कनेक्टीविटी मिळणार आहे. उद्योग व्यापार वाढवण्यासाठी फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे आपली खूप सोय झाली आहे. संभाजीनगर ते पुणे हा द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार आहे. हिंगोलीतून साडेतीन तासात संभाजीनगरला पोहोचणार आहे. या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचे सामाजिक, आर्थिक मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नामदेव महाराज आपले साहित्यिक, सांस्कृतिक वारसा आहेत. त्यांच्या गावचा रस्ता होतोय त्यामुळे मला आनंद होत आहे. या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास त्या उपलब्ध करुन देता येतील. आज भेंडेगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या ७५ कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी दिली. हिंगोली शहरात बासंबा फाटा येथे २० कोटी रुपयाच्या उड्डाणपुलाला सीआरएफ मधून मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गामुळे विकासाला चालना देण्याचे काम – पालकमंत्री अब्दुल सत्तार

राष्ट्रीय महामार्गामुळे विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे गेल्या आठ महिन्यात विकासाला चालना देण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय महामार्गामुळे शेतकऱ्याला सक्षम करण्याचे काम झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी कनेक्टीविटी निर्माण झाली आहे. या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी मागणी  केलेल्या कामाला मान्यता देण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाच्या वतीने या जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या नानाजी देशमुख यांच्या नावाने कृषी विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा टप्पा क्र. २ ची १० हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे यांची समायोचित भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!