फलटण: अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र – चक्क PWD उपअभियंत्याच्या घरावर चालला जेसीबी


फलटण शहरात पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम तीव्र झाली असून, नगरपालिकेने चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या निवासस्थानाचे अतिक्रमणही जमीनदोस्त केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ जून : फलटण शहरात, विशेषतः पालखी मार्गावर सध्या अतिक्रमण काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. या मोहिमेत नगरपालिकेने कोणतीही गय न करता धडक कारवाई सुरू ठेवली असून, शासकीय निवासस्थानावरील अतिक्रमणालाही लक्ष्य केले आहे.

उपअभियंत्याच्या निवासस्थानावर कारवाई

शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारीत असलेल्या उपअभियंत्यांच्या निवासस्थानाचे वॉल कंपाऊंड रस्त्याच्या काही भागात अतिक्रमित असल्याचे समोर आले होते. या मोहिमेचा भाग म्हणून नगरपालिकेने या कंपाऊंडवरही जेसीबी चालवून ते पाडून टाकले आहे. शासकीय अधिकाऱ्याच्याच घरावर कारवाई झाल्याने या अतिक्रमण हटाव मोहिमेची शहरात मोठी चर्चा होत आहे.

रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या निवासस्थानावरील या कारवाईमुळे आता श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते माळजाई हा रस्ता अतिक्रमणमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे. या कारवाईमुळे रस्त्याची रुंदी वाढणार असून, या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटून रस्त्याने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला आहे.


Back to top button
Don`t copy text!