दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
आळंदी – पंढरपूर – मोहोळ राष्ट्रीय पालखी महामार्ग फलटण शहराबाहेरून वळविताना शहरालगत चौधरवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीतील होळकर वस्ती व परिसरातील शेतकर्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेला रस्ता अचानक बंद केल्याने येथील शेतकरी, रहिवाशी यांची कोंडी झाल्याचे निदर्शनास आणून देत या वस्तीसाठी पर्यायी मार्ग काढून दिला नाही तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
आळंदी – पंढरपूर – मोहोळ राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर चौधरवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत होळकर वस्तीलगत उड्डाण पुलाचे काम सुरु असून या कामामुळे सर्व्हे नंबर ३६ व ३६ ब आणि होळकर वस्ती व परिसरात ये – जा व माल वाहतूक करणारा रस्ता पूर्णतः बंद झाला असल्यामुळे येथील रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी तसेच शेतमालाची किंवा शेतीसाठी खते कीटकाशके किंवा कोणतीही वाहने, शेतीची औजारे नेण्या-आणण्याची वाट बंद झाल्याने सर्वांचेच मोठे नुकसान आणि कुचंबना होत आहे. या ठिकाणी सर्व्हिस रोड देण्यात यावा, अन्यथा प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा येथील शेतकरी व रहिवाशांनी दिला आहे.
नीरा उजवा कालव्यावर उड्डाण पूल उभारण्यात येत आहे, तर दुसर्या बाजूला रेल्वे लाईन असल्याने येथून बाहेर पडण्यास रस्ता राहिला नाही, याबाबत अधिकार्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. परिणामी सर्व्हे नंबर ३६ व ३६ ब चे एकूण साधारण क्षेत्र १९ एकर मधील सर्व शेतकरी व रहिवाशांचे जीवन व उदरनिर्वाहाचे साधन शेतीवर अवलंबून असल्याने शेती कामे ठप्प झाली, उत्पन्न बंद झाले तर त्यांचेवर मोठे संकट येणार असल्याने प्राधान्याने रस्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे करण्यात आली आहे.
नीरा उजवा कालवा लगतचा जुना रस्ता किंवा राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोड या दोन्ही मधील एक रस्ता तयार करण्याचे आदेश तात्काळ देऊन शेतकरी व रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही तर दि. ३० आक्टोबरपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा अॅड. कांचनकन्होजा खरात व शेतकरी, रहिवाशी यांनी दिला आहे.