प्रसिद्ध पंजाबी गायक काळाच्या पडद्याआड : सरदूल सिकंदर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन


लोकप्रिय पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, याच काळात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली होती. सरदूल यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीमधील अनेक गाणी गायली आहेत आणि ती हिट देखील झाली होती. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. कॉमेडियन कपिल शर्मा, दलेर मेहंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरदूल यांच्या निधनाची माहिती देत श्रद्धांजली वाहिली आहे.

सरदूल यांच्या पत्नी अमन नूरी यादेखील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांना सारंग आणि आलाप ही दोन मुले आहेत. दोघेही संगीताच्या क्षेत्रात काम करत आहेत.

1980 मध्ये आला होता सरदूल यांचा पहिला अल्बम
सरदूल यांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत. त्यांचा ‘रोडवेज दी लारी’ हा पहिला अल्बम 1980 मध्ये आला होता. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1991 मध्ये आलेल्या हुस्ना दे मल्को या अल्बमने त्यांना जागतिक लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यावेळी त्यांच्या अल्बमच्या 5.1 मिलियन कॉपींची विक्री झाली होती. सरदूल यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला होता. पंजाबी चित्रपट ‘जग्गा डाकू’ यातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.


Back to top button
Don`t copy text!