फलटण तालुक्यातील कारखानदारांनी मागील वर्षीच्या गाळप उसाचा अंतिम दर जाहीर करावा

शेतकरी संघटनांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मागील वर्षीच्या गाळप उसाचा फलटण तालुक्यातील कारखानदारांनी अंतिम दर जाहीर करावा, असे निवेदन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना तालुक्यातील शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखाना, स्वराज साखर कारखाना उपळवे, शरयू साखर कारखाना प्रा.लि. मोटेवाडी व श्रीदत्त इंडिया साखर कारखाना प्रा.लि. साखरवाडी या कारखानदारांनी तालुक्यातील १८ ते २० लाख टनाचे गाळप केलेले आहे. आत्तापर्यंत सदर कारखान्यांनी २७०० ते २८०० रूपये उचल दिलेली आहे. या कारखान्यांकडून अंतिम दर अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

याउलट शेजारील बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याने ३४११/-, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याने ३३५०/- हा दर अंतिम जाहीर केलेला आहे. फलटण तालुक्यातील उसाला बारामती तालुक्यातील उसापेक्षा रिकव्हरी जास्तच आहे. शेतकरी हिताचा विचार करून फलटण तालुक्यातील सर्व कारखानदारांनी निर्णय घेऊन ३३०० ते ३४०० चा अंतिम दर जाहीर करावा. तसे न झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी व तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या वतीने १० ते १२ दिवसांची वाट पाहून उपविभागीय कार्यालयासमोर कारखानदारांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

आपण विविध शेतकरी संघटना व शेतकर्‍यांच्या बाजूने लढणारे शेतकरी व चळवळीतील पदाधिकारी व कारखानदार यांची बैठक घेऊन सदरप्रश्नी तोडगाव काढावा, अशी मागणी सचिन ढोले यांच्याकडे केली आहे.

हे निवेदन देताना श्री. अशोकराव सस्ते, श्री. बजरंग गावडे, श्री. मच्छिंद्र निकम, श्री. महादेव कदम, श्री. शामराव आडके, श्री. वाल्मीक एजगर, आझादसिंह उर्फ शंभूराज खलाटे, दिलावर लतिफभाई काझी, विकास राजाराम माळी हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!