दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । काय झाडी, काय डोंगार, काय हाटीलमुळे प्रकाशझोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू आता पुन्हा चर्चेत आलेत. यावेळी विषय आहे अजित पवार. अजित पवारांना त्यांनी इंदुरीकर महाराजांची कीर्तनं ऐकण्याचा सल्ला दिला आहे. तसंच अजित पवारांच्या मनात काय चालतं, हे शरद पवारांनाही कळलं नाही, मला काय कळणार, असंही शहाजी पाटील म्हणाले आहेत.
अजित पवारांबद्दल बोलताना शिंदे गटाचे सांगोल्यातले आमदार शहाजीबापू पाटील यांना अजित पवार भाजपाच्या गळाला लागतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भाष्य करताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, हा माझ्यासारख्या छोट्या माणसाचा मुद्दा नाही. माझं आणि अजितदादांचं नातं हे वेगळं आहे, आमच्या नात्यात जिव्हाळा आहे. पण अजितदादांच्या मनात काय आहे, कुणाला कळत नाही. जिथं शरद पवार साहेबांनासुद्धा कळलं नाही, तिथा मला कसं कळेल? त्यामुळे अजितदादा कधी झटका देतील, हे सांगता येत नाही.
शहाजी पाटलांनी अजित पवारांना एक सल्लाही दिला आहे. इथून पुढे अजितदादांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचीच भाषणं ऐकावीत. ओशोच्या कॅसेट्स आणाव्यात, तसंच इंदुरीकर महाराजांची कीर्तनंही ऐकावीत. भाषणं ऐकण्याशिवाय आमच्या दादांना आता काय काम राहिलं आहे.