मला बदनाम करण्याचा प्रयत्न, टेकचंदानींना कोणतीही धमकी दिली नाही; भुजबळांनी आरोप फेटाळले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ आणि इतर दोघांविरुद्ध एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला एक व्हिडिओ फॉरवर्ड केला होता. ज्यामध्ये हिंदू धर्माविरुद्ध वक्तव्य केलं गेल्याचं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

या संदर्भात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) शुक्रवारी रात्री उशिरा चेंबूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला, असं त्यांनी सांगितलं. “त्या व्यक्तीनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, भुजबळ आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 506 (2) (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असंही अधिकाऱ्यानं आज सांगितलं.

हिंदू धर्माचा अपमान केल्याचं भाषण छगन भुजबळ यांना मोबाईलवरून दोन व्हिडिओ पाठवले होते, असं पीडित व्यावसायिक टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय. व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना व्हॉट्सएप कॉल्स आणि मेसेजद्वारे धमक्या मिळू लागल्या, ज्यामध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली, असा आरोप आहे.

मात्र, छगन भुजबळ यांनी धमकी दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. भुजबळ म्हणाले, माझं नाव खराब करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. गेली 10 वर्षे टेकचंदानींचं माझ्याशी वैर आहे. पण, मी त्याला कधीच कोणता फोन अथवा व्हाॅटसऍप मेसेज केला नाही. आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं तो फोन उचलला नाही. टेकचंदानीला मी कोणतीही जीवे मारण्याची धमकी दिली नसल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं. सरस्वती प्रकरणावरुन मला बदनाम करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.


Back to top button
Don`t copy text!