गरजूंना मदतीच्या हेतूने ‘क्रांतीसुर्य प्रतिष्ठान’ची स्थापना : मिलींद नेवसे


स्थैर्य, फलटण दि.२४ : क्रांतीसुर्य प्रतिष्ठान फलटण ही सामाजिक संस्था फलटण तालुक्यातील वंचित आणि गोरगरीब समाजातील लोकांचे जीवनमान उंचवावे आणि सर्व समाजाची प्रगती व्हावी, त्यांना मदत करता यावी या उदात्त हेतूने स्थापन करण्यात आली असल्याचे प्रतिपादन, क्रांतीसुर्य प्रतिष्ठान फलटणचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले.
येथील माळजाई उद्यानामध्ये क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने वाचन संस्कृती वाढावी या हेतूने महिलांना विविध पुस्तकांचे आणि कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप करण्यात आले त्यावेळी मिलिंद नेवसे बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार, शहाजी शिंदे उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर आधारित क्रांतीसुर्य प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून या प्रतिष्ठान मार्फत विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच तळागाळातील घटकांसाठी हे प्रतिष्ठान प्रामुख्याने काम करणार असल्याचे मिलिंद नेवसे यांनी सांगितले.
आज मोबाईलच्या आधुनिक जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली असून वाचनालय बंद पडत चालले आहेत. वाचन नसल्याने लोक देशाचा इतिहास, वैभव विसरू लागले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान तर्फे विविध प्रकारची दर्जेदार पुस्तके, साहित्य, ग्रंथ मोफत देत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन नेवसे यांनी केले.
 क्रांतीसुर्य प्रतिष्ठान मार्फत यापुढील काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार असून गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार आहोत. गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी शिबीर आणि मोफत औषधे देण्याचा उपक्रम लवकरच राबविणार असून कोरोना काळातही मोफत सॅनिटाईझर, मास्कचे वाटप आम्ही केले आहे. तरुणांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे यासाठी मोफत सेमिनार देखील घेणार असून समाजाचे काहीतरी देणे आपण लागतो या सामाजिक हेतूने आम्ही प्रतिष्ठान सुरू केल्याचे, मिलिंद नेवसे यांनी सांगितले. प्रकाश इनामदार यांनी आभार मानले

Back to top button
Don`t copy text!