
स्थैर्य, हिंगोली, दि.१३: हिंगोली जिल्हयातील ताकतोडा येथे गुरांच्या गळ्यात ‘ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या’ चे फलक लाऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ता. 13 अनोखे आंदोलन केले. यावेळी कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्हयात कृषीपंपाची सुमारे ३०० कोटींच्या वर देयकांची वसुली आहे. वीज कंपनीच्या वतीने मागील काही दिवसांपासून कृषीपंपाच्या देयकाच्या थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये कृषीपंपाला वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेले ट्रान्सफार्मरच बंद केले जात आहे.त्यामुळे एकाच वेळी तीन ते चार गावातील कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत होत आहे.
दरम्यान, वीज कंपनीच्या या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वीज कंपनीने चालु देयक भरून वीज पुरवठा सुरळीत करावा अशा सुचना शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वीज कंपनीला दिल्या होत्या. तर भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यास विरोध दर्शविला आहे.
त्यानंतरही हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा व परिसरातील कृषीपंपांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर बंद करून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह शेतकरी रामकिसन पतंगे, विठ्ठल पतंगे, किशोर पतंगे, रामराव पतंगे, माधव सावके, संजय सावके, चंद्रकांत सावके, झनक सावके, गजानन उजळे, ज्ञानेश्वर उजळे, गजानन तायडे यांनी गुरांच्या गळ्यात फलकच बांधले. ‘ऊर्जामंत्री वीज पुरवठा खंडीत केला, आता पिण्यासाठी पाणी द्या’ असे फलक या गुरांच्या गळ्यात अडकवून आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे ताकतोडा येथील शेतात हे आंदोलन करण्यात आले आहे.
वीज कंपनीकडे निवेदन देणार : नामदेव पतंगे, युवक जिल्हाध्यक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटना
सध्या ग्रामीण भागातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेले ओढे, नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळेच हे आंंदोलन करण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कंपनीला निवेदन दिले जाणार आहे.