
स्थैर्य, अमरावती, दि.२६: ग्रामीण भागात कोरोनाबाधित वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुविधा वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गुरुकुंज मोझरी येथे 175 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना तत्काळ उपचार सुविधा याठिकाणी उपलब्ध होणार आहे. यापुढेही रुग्णांना तत्पर वैद्यकीय उपचार सुविधा यासह आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.
गुरुकुंज मोझरी स्थित श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालय (धर्मदाय) 175 खाटांच्या कोविड केअर सेंटरची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक उपचार सुविधा गतीने उभारण्यात येत आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या परिसरात शंभर खाटांचे नवे स्वतंत्र रुग्णालय उभे राहणार आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या मधुमेही व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस आजार होताना आढळून येत आहे. जिल्ह्यात मुक्यरमायकोसिसचे अनेक रुग्ण आढळून आले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी अधिक खर्च लागतो. जिल्ह्यात कोरोना व म्युकरमायकोसिस आजारांचा आकस्मिक आजारात समावेश करण्यात आला असून गरीब रुग्णांना या आजारांवर उपचाराचा खर्च महात्मा जोतिराव फुले जीवनदायी योजनेचा लाभ देऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुरुकुंज मोझरी येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी होत होती. हे लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी काल तिथे प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करुन लवकरात लवकर पक्का रस्ता करावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाबाबत आदेश प्रशासनाला दिले.
उपचार सुविधा पुरविण्याबरोबरच नियमांचेही काटेकोर पालन होणे आवश्यक
ग्रामीण भागात कोविडबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती तालुक्यातील ग्रामीण भागाची पाहणी केली. ग्रामीण भागात परिपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच सर्व दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणेही आवश्यक असल्याचे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी आज अमरावती तालुक्यातील देवरा शहिद येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.
देवरा येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यानुसार आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक उपचार आदी कार्यवाही होत आहे. सध्या तिथे पाच ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. या अनुषंगाने पुरेशा उपचार सुविधा देतानाच कंटेनमेंट झोन, होम आयसोलेशनमधील रुग्णांवर देखरेख, सातत्याने संपर्क व समन्वय या बाबी काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने प्रत्येक केंद्राची गरज लक्षात घेऊन आवश्यक प्रस्ताव वेळेत सादर करावेत. जिल्हा प्रशासनाशी नियमित समन्वय ठेवावा. गावपातळीवर लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिकांनी समन्वयाने साथ नियंत्रणासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पाच हजार मास्क व सॅनिटायझर सामग्रीचे वितरणही करण्यात आले. गावातील लसीकरण केंद्रालाही त्यांनी भेट दिली. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण नियोजनपूर्वक करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे आदेश प्रशासनाला दिले.