शिक्षणाधिकारी राजेश क्षिरसागर यांनी घेतली शेतात बसुन ऑनलाईन बैठक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

सातारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर शेतात झाडाखाली बसून ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले असताना शेजारी उभे राहुन फलटणचे प्रभारी गटशिक्षणाधिरी रमेश गंबरे त्यांना सहाय्य करताना.

स्थैर्य, फलटण दि. २१ : हिंदुस्थान स्वतंत्र होऊन 72 वर्षे झाल्यानंतर या देशातील सामान्य माणूस समाधानी आहे का ? असे सर्वेक्षण केले तर निश्‍चित सकारात्मक उत्तर येणार नाही याची खात्री देण्यापेक्षा ते उत्तर सकारात्मक येईल यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचे काम प्रामाणिकपणे करण्याची आवश्यकता येथील एका घटनेतून स्पष्ट झाली आहे. 

सातारा जिल्हा परिषद प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर हे त्यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कार्यक्षम अधिकारी म्हणून परिचित असलेले सातारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर हे आपले काम प्रभावीपणे, सक्षमपणे करतात. त्यांच्या अनेक उपक्रमांचे राज्यस्तरावरुन कौतुक झाले असून फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याच्या शासन निर्णयाची माहिती पालक, शिक्षक व संबंधीत घटकांना देण्यासाठी प्रयत्नशील असताना त्यांचा वेगळाच पैलू समोर आला आहे. 

कोणताही बडेजाव न करता त्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची ऑनलाइन बैठक घेतली, ती फलटण तालुक्यातील एका शेतात बसून, त्याचे झाले असे, दि. 23 नाहेंबर पासून शाळा सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांच्या शाळा व्यवस्थापन समिती बैठका होत आहेत, प्रातिनिधिक स्वरुपात शाळा व्यवस्थापन समिती बैठकीला उपस्थित राहणेसाठी शिक्षणाधिकारी क्षीरसागर सरडे ता. फलटण येथील माध्यमिक विद्यालयात आले होते. सदर बैठकीनंतर पूर्व नियोजनानुसार त्यांना जिल्हयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची ऑनलाइन बैठक घ्यावयाची होती. 

तांत्रिक बिघाडामुळे सरडे हायस्कूल व गावात मोबाईलला पुरेशी रेंज नसल्याने सदर पूर्व नियोजित बैठक घेण्यात अडचण निर्माण झाली. तांत्रिक बाबीवर मात करुन आपले काम पुढे नेण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला, तात्काळ गाडी गावाच्या बाहेर घेतली आणि 1/2 कि.मी. अंतरावर रेंज उपलब्ध झाल्याचे स्पष्ट होताच वेळ वाया जाऊ नये म्हणून लगेच गाडी तेथेच थांबवून रस्त्याकडेला झाडाखाली बसून ऑनलाइन बैठकीचे कामकाज तेथूनच सुरु केले. अशाप्रकारे शेतात बसून जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना परिपूर्ण मार्गदर्शन केले. आपले कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानून काम करणारे अधिकारीच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ जाणून त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात हातभार लावत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. 

असा अधिकारी विरळाच कोणताही बडेजाव नाही, बसायला खुर्ची, साधी सतरंजीही नाही, पेपरवेट म्हणून छोटा दगड कागदावर ठेवून काम सुरु ठेवणार्‍या या अधिकार्‍याचे कौतुक करावे तेवढे कमीच पडेल अशी त्यांची ही कृती आहे. 

सातारा जिल्ह्यात जून 2018 मध्ये रुजू झाल्यापासून माध्यमिक शिक्षण विभागाला त्यांनी एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहेे. प्रत्येकाची समस्या जाणून घेवून त्याला योग्य मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करुन त्याच्याकडून काम करुन घेण्यात शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांचा हातखंडा आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!