
थेट WhatsApp वर मिळवा
दुधेबावी येथे ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे उद्घाटन न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक यशाचे विशेष कौतुक केले.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ नोव्हेंबर : ग्रामीण भागात सातत्यपूर्ण व्याख्यानमाला राबवणे ही बाब उल्लेखनीय असून, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी केले. दुधेबावी (ता. फलटण) येथे ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने ‘दुधेबावी फेस्टिव्हल’ अंतर्गत आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान
कुंडल वन प्रबोधिनीचे (सांगली) प्रशासक हरिश्चंद्र वाघमोडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवलेले सोहम शेंडे, मंडल कृषी अधिकारी पदी निवड झालेली प्राजक्ता नाळे आणि राज्यकर निरीक्षक पदी निवड झालेली सुप्रिया आडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्या विजया सोनवलकर, सरपंच भावना सोनवलकर, पोपटराव मिंड, संपतराव नाळे, सचिन सोनवलकर उपस्थित होते.
जिद्द आणि परिश्रमातून यश निश्चित
यावेळी न्यायमूर्ती पानसरे म्हणाले, जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास यश मिळणे कठीण नाही. द्वेष आणि मत्सर हद्दपार करून प्रत्येकाने प्रगती साध्य करावी. गेली २६ वर्षे गावात सातत्यपूर्ण व्याख्यानमाला राबवल्यामुळे युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोठी प्रेरणा मिळत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यशाचे शिखर गाठत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैचारिक प्रगतीची गरज
हरिश्चंद्र वाघमोडे यांनी प्रबोधनातून सकारात्मक समाज परिवर्तन होत असल्याचे सांगितले. धनसंपत्तीपेक्षा ज्ञानसंपत्तीला अधिक महत्त्व असून आर्थिक प्रगतीपेक्षा वैचारिक प्रगती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी हनुमंतराव सोनवलकर, यशस्वी विद्यार्थी सोहम शेंडे आणि उद्योजक राजेंद्र नाळे यांनीही आपले विचार मांडले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी स्वागत केले. डॉ. सागर कराडे यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार नाळे व डॉ. युवराज एकळ यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिन सोनवलकर यांनी आभार मानले.





