डॉ. आंबेडकरांचे खरे अनुयायी होण्यासाठी त्यांचे आदर्श, विचार, संस्कार, शिकवण आत्मसात करा – सचिन मोरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ मे २०२३ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणवून घेताना त्यांचे आदर्श, त्यांचे संस्कार आणि त्यांची शिकवण यांचा मागोवा घेत प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण घेऊन आपली, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती साधण्याची आवश्यकता आहे, अन्यथा त्यांचे अनुयायी म्हणवून घेण्याचा अधिकार आपल्याला गमवावा लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन धैर्य टाईम्सचे संपादक सचिन मोरे यांनी केले.

मिरगाव, ता. फलटण येथे आयोजित डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सचिन मोरे बोलत होते. यावेळी आयकर सहआयुक्त तुषार मोहिते, पोलिस पाटील दत्तात्रय सरक पाटील, माजी सरपंच भानुदास सरक, वंचित बहुजन आघाडीचे सुभाषराव गायकवाड, अरविंद मेहता यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पिंप्रद, ता. फलटण येथे यावर्षी डी. जे. व फटाके मुक्त जयंती साजरी करण्याबरोबर केवळ जयंती दिनी डॉ. आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर वर्षभर पुन्हा डॉ. आंबेडकर यांचे विचार, त्यांचे आदर्श आणि संस्कार विसरता येणार नाहीत, याची जाण ठेवून पिंप्रद येथे वर्षभर डॉ. आंबेडकर यांचे विचार, आदर्श व संस्कारांचा जागर करण्यात येणार असल्याचे सचिन मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

पिंप्रद प्रमाणे मिरगाव येथील अवघ्या १६/१७ कुटुंबांच्या वस्तीतील प्रत्येकाने डॉ. आंबेडकर यांच्या आदर्श व विचारांचा मागोवा घेत आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देवून प्रगतीचा टप्पा गाठण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, त्याचवेळी आपणही वेळ मिळेल त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर यांच्या विचार, संस्कार व आदर्शांची माहिती घेत आपले व्यवसाय, नोकरी प्रामाणिकपणे करावी व आपली प्रगती साधावी, असे आवाहन सचिन मोरे यांनी मिरगाव येथील भीम अनुयायी कुटुंबांना केले.

यावेळी सुभाष गायकवाड व ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची भाषणे झाली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आयकर सहआयुक्त तुषार मोहिते यांनी तरुण व विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी काही पुस्तके उपलब्ध करून दिली. त्याचे वितरण यावेळी करण्यात आले.

एनटीसी प्रवर्ग मध्ये एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रोहन आनंदा सरक व सहावा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. संस्कृती दत्तू सरक या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. विशाल मोहिते यांनी केले तर आभार कमलाकर मोहिते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दास मोहिते, राजेंद्र मोहिते, राजेंद्र बा. मोहिते, अनिल मोहिते, भगवान मोहिते, गौतम मोहिते, रवींद्र मोहिते, महादेव मोहिते, विष्णू मोहिते, विनायक मोहिते, सुदाम मोहिते, युवराज मोहिते, राजेंद्र भा. मोहिते, प्रकाश ब. मोहिते, गौतम वि. मोहिते, अनिल मोहिते, विकास मोहिते, बलभीम मोहिते, बाबू मोहिते, नंदू मोहिते, रणजित मोहिते, नाना मोहिते, अजय कांबळे, अशोक भोसले, विश्वनाथ मोहिते, सारंग मोहिते, किरण मोहिते, कांताराम मोहिते, विशाल मोहिते आदींनी परिश्रम घेतले.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!