अमृतमहोत्सवाचा सत्कार नको; माझी नगरपालिका मला द्या !; शुक्रवार पेठेतील कार्यकर्ता मेळाव्यात श्रीमंत रामराजेंची साद


दैनिक स्थैर्य । दि. 23 फेब्रुवारी 2023 । फलटण । ‘‘1991 साली फलटण शहरात राजकारण सुरु केल्यानंतर आपण शून्यातून राजकीय विश्‍व निर्माण केलं आहे. आधुनिक फलटण शहराचं स्वप्न मी पाहिलं असून ते पूर्ण होत आहे. शहर विकासाला आपण कधीच निधी कमी पडून दिला नसून फलटणमध्ये सत्तांतर घडवून आणण्याची कुणाच्यात हिंमत नाही. निवडणूका कधीही लागू शकतील. त्यादृष्टीने आपल्याला पावले टाकायची आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गट, पक्ष आणि नेतृत्त्व सोडून जमणार नाही हे लक्षात ठेवावे. मला अमृतमहोत्सवाचा सत्कार नको; माझी नगरपालिका फक्त मला द्या, असे उद्गार महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.

फलटण शहरातील शुक्रवार पेठ येथील कार्यकर्ता मेळाव्यात आ.श्रीमंत रामराजे बोलत होते.

सगळ्यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घेवू

‘‘फलटणची संस्कृती संपूर्ण जिल्ह्यात चांगली आहे. ती टिकवण्यासाठी नगरपालिका आपल्याकडेच रहायला हवी. जो पर्यंत मी डोळे मिटत नाही तोपर्यंत फलटण शहराला सोडणार नाही. ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर निवडणूका लागतील. आपले राजकारण सर्वसमावेशक असल्याने आपल्याला या निकालाचा फरक पडत नाही. सगळ्यांना विश्‍वासात घेवून जे ठरेल त्याच्या मागे तुम्ही ठामपणे उभे रहा’’, असे आवाहनही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.

…तर त्यांच्या 10 पिढ्या फलटणमध्ये येणार नाहीत

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उद्देशून बोलताना आ.श्रीमंत रामराजे म्हणाले, ‘‘त्यांना मिळालेल्या पदातून त्यांनी सोन्याचा फलटण तालुका करायला हवा होता. पण केवळ आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे. निरा – देवघर माझ्या प्रयत्नातून झालं आणि पाईपलाईन मधून पाणी आणण्याचं श्रेय ते घेत आहेत. ते कौतुक करत असलेली रेल्वे रिकामी धावत आहे. त्या माणसाकडे चांगल काम करण्याची इच्छा नसून राक्षसी महत्त्वाकांक्षेचा तो मनुष्य आहे. आम्ही केलेल्या कामात अडचणी आणण्यापलिकडे त्यांनी काहीही केले नाही. अशा माणसांबाबत मी आता गप्प बसणारच नाही. पण माझ्यापेक्षा तुम्ही जर मनात आणलं तर त्या सद्गृहस्थाच्या पुढच्या 10 पिढ्या फलटणमध्ये येवू शकत नाहीत’’, असा टोलाही आ.श्रीमंत रामराजे यांनी लगावला.

आपापसात भांडणार्‍या नगरसेवकांकडही बघणार

‘‘30 वर्षे आम्ही जे काम केले आहे त्यामुळे फलटण आधुनिक शहर होत आहे. विकासाची संस्कृती आम्ही तयार केली आहे. माझं माझ्या घरावर जेवढं लक्षं नसतं तेवढं फलटण तालुक्यावर व दुष्काळी भागावर लक्ष असतं. गेल्या 15 वर्षात शहराला निधी कमी पडू दिला नाही. काही कामे राहिली असतील, नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्याही माझ्यापर्यंत येत असतात त्याही सोडवल्या जातील. काही नगरसेवक एकमेकांशी भांडत असतात त्यांच्याकडंपण मी या निवडणूकीत बघणार आहे’’, असेही सूचक विधान आ.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी केले.

प्रारंभी ढोल – ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे शुक्रवार पेठ येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या गणपतीची आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर मंडळाच्या ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांच्या हस्ते आ.श्रीमंत रामराजे यांचा सत्कार संपन्न झाला.

मेळाव्याप्रसंगी आजी – माजी नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!