
सण-उत्सवांच्या काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे प्राणी आणि पक्ष्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी ध्वनीमर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०७ सप्टेंबर : सण-उत्सवांच्या काळात डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजामुळे पाळीव प्राणी, भटके प्राणी आणि पक्ष्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या आवाजासोबत निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनांमुळे प्राण्यांमध्ये भीती, मानसिक तणाव, अस्वस्थता आणि आक्रमकता वाढत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. सणासुदीच्या काळात प्राण्यांमधील कानाच्या विकारांशी संबंधित तक्रारींमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
श्वानांवर आणि दुभत्या जनावरांवर परिणाम
मानवाच्या तुलनेत श्वानांची श्रवणक्षमता अधिक संवेदनशील असल्याने मोठ्या आवाजाचा त्यांच्यावर तीव्र परिणाम होतो. घाबरून सुरक्षित जागेच्या शोधात वाहनांखाली किंवा अंधाऱ्या ठिकाणी लपताना अचानक कोणी जवळ गेल्यास भीतीपोटी ते आक्रमक होण्याची शक्यता असते. डीजेच्या दणदणाटामुळे दुभत्या गाई-म्हशींवरही ताण निर्माण होऊन दूध देण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
पक्षी आणि इतर प्राण्यांना फटका
पक्षी आणि वटवाघळांसारख्या निशाचर प्राण्यांच्या हालचालींवर तीव्र आवाज आणि कंपनांचा विपरीत परिणाम होतो. सरपटणाऱ्या प्राण्यांना जमिनीवर निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनांमुळे त्रास होतो. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. कुणाल मुनाळे यांच्या मते, डीजे आणि फटाक्यांच्या आवाजामुळे प्राण्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होतो. त्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करताना मुक्या जीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.