बस चालकाला भोवळ; पिंपोडेत वाठार-वाई बसला मोठा अपघात, प्रवाशी थोडक्यात बचावले


 


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा), दि.१७ : येथे चालकाच्या छातीत
दुखू लागल्याने एस.टीचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन वाहनांचे मोठे
नुकसान झाले. सुदैवाने एसटी चालक व सर्व प्रवाशी अपघातातून बचावले आहेत. आज
दुपारी दीडच्या सुमारास वाई आगाराची वाठारहून वाईला जाणारी एस.टी पिंपोडे
बुद्रुक येथे बसस्थानकानजीक राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाजवळ आल्यानंतर
एस.टी चालक अशोक फरांदे (रा. ओझर्डे) यांना छातीत अचानक तीव्र वेदना
झाल्या. 

त्यानंतर भोवळ आल्याने काही समजण्याच्या आतच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला.
गाडी विरुध्द दिशेला जात बसने आधी रस्त्यावरील दुचाकीला धडक दिली. त्यानंतर
रस्त्यापासून सुमारे तीस फूट लांब असणाऱ्या दुकानासमोर पार्किंग केलेल्या
चारचाकी इनोव्हा गाडीला जोरदार धडक देऊन एस.टी थांबली.

या ठिकाणी इनोव्हा गाडी नसती, तर एस.टी थेट ज्वेलरीच्या दुकानात गेली असती.
मात्र, मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये एस.टी चालक फरांदे किरकोळ जखमी झाले
आहेत. सुदैवाने सर्व प्रवाशी अपघातातून बचावले. फरांदे यांना प्राथमिक
उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जिल्हा
शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. ज्वेलरी दुकान मालक राजेंद्र धर्माधिकारी
यांच्या इनोव्हा गाडीचे प्रचंड नुकसान झाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!