वातावरणातील बदलाने रब्बीची पिके धोक्‍यात; पीकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 


स्थैर्य, विसापूर (जि. सातारा), दि.१८ : खटाव तालुक्‍याच्या उत्तर भागात
मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर दररोज होणाऱ्या वातावरणातील
बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने येथील शेतकरी
चिंतातूर झाले आहेत. शेतातील नुकतेच लागण केलेले कांद्याचे पीक
वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषधींची फवारणी करावी लागत आहे. याबाबत कृषी
विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 

यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील
खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या मुसळधार पावसामुळे
शेतात बरेच दिवस पाणी साचले. शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने
रब्बीसाठी शेती तयार करता येत नव्हती. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत
माजले. शेतकऱ्यांनी शेतातील खरिपाची सुगी उरकून गवताची साफसफाई करून गहू,
हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी केली असून, कांदा, बटाटा पिकाची लागण केली
आहे. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आशा पल्लवीत होत असताना
ढगाळ वातावरणामुळे पिके माना टाकत आहेत. परिणामी पिकांची वाढ खुंटण्याची
शक्‍यता निर्माण झाली असून, जोमाने उगवण, लागण झालेल्या पिकांवर रोग पडत
असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

पिके जोमदार आणण्यासाठी शेतकरी औषध फवारणी, जादाची खते यासारखे विविध उपाय
करत आहेत. मात्र, यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होत आहे. दर वर्षी
नोव्हेंबर महिन्यात थंडीस सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात
थंडी पडते. ही थंडी रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, गहू, हरभरा व इतर
पिकांना पोषक असते. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल सुरू
झाली होती. मात्र, अचानक तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे हवेतील थंडीचे
प्रमाण कमी होत आहे. सद्यःस्थितीत कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण आहे. यामुळे
पिके पिवळी पडून सुकत असल्याचे चित्र दिसत आहे. 

ढगाळ वातावरणामुळे फारशी थंडी पडत नसल्यामुळे रब्बी हंगामातील लागवड
झालेल्या पिकांना निसर्गाचा कोणताही फायदा होत नाही. या प्रतिकूल
हवामानामुळे कांदा, हरभरा आदींसह रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
होत आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!