खर्चाला फाटा देत नवदांपत्यांने चवणेश्वर ग्रामस्थांना केली जीवनावश्यक वस्तूंची मदत


डोंगरावर असणारे एकमेव गांव: पिंपोडे जिमखाना, हँडबॉल असोसिएशनचाही मदतीचा हातभार

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊनच्या काळात विवाह झालेल्या नवदांपत्यानी खर्चाला फाटा देत,सामाजिक व विधायक विचारातून कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असणाऱ्या व कोरोना संकटाचा सामना करतं असणाऱ्या चवणेश्वर गावांतील हातावर पोट असणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.

कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असणारे साडेतीनशे लोकांचे गांव ! डोंगराच्या खाली असणाऱ्या गावांतील लोकांच्या शेतात जाऊन रोजंदारीने काम करणे आणि जोडधंदा म्हणून घरी एक, दोन गायी संभाळून गुजराण करणे हा येथील लोकांचा मुख्य चरितार्थ आहे. अनेक समस्यांची असणारी वाणवा, मात्र कोरोनाच्या महासंकटात आर्थिक समस्ये बरोबर दैनंदिन जीवन जगणेही अनेकांचे मुश्किल झाले आहे. यामध्ये अनेक क्षेत्रासह शेतीला सुध्दा मोठा फटका बसला आहे. कायम दुसऱ्याच्या शेतात जाऊन दोन वेळची चूल पेटवणाऱ्या लोकांना या लॉकडाऊन व कोरोना संकटाने हाताश केले आहे. अनेक सर्व सामान्य कुटुंबाना हाताला काम मिळत नसल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होऊ लागली आहे. माणूसकीची साद घालत परिसरातील लोकांनी मदतीच्या आवाहनाच्या आशयाची पोस्ट सामाजिक कार्यकर्ते सुमित भोईटे यांची फेसबुक व सोशल मिडीयावर फिरत होती. या आवाहनाला प्रतिसाद देत विधायक हेतूने पिंपोडे बुद्रुक येथील व पुणे येथे नोकरीला असणारे अमित सुभाष लेंभे आणि सौ. अल्पना लेंभे यांचा या लॉकडाऊनमध्ये विवाह मे महिन्यात झाला आहे. खर्चाला फाटा देत विधायक कार्याला मदत करण्याचा या नवदांपत्याचा मानस होता.आणि योगायोगाने ही सोशल मिडीयावरील पोस्ट पाहिली आणि या नवदांपत्य आणि क्रिडा क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या जिमखाना आणि हँडबॉल असोसिएशन यांनी सुमित यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत चवणेश्वर डोंगरावर असणाऱ्या गावांत जाऊन तीस कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे किटचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी जिमखाना असोसिएशनचे संस्थापक दत्तात्रय पवार, अध्यक्ष संदीप कदम,सचिव सचिन लेंभे (सर), सुमित भोईटे, सरपंच दयानंद शेरे, माजी उपसरपंच युवराज शेरे, संतोष पवार, पै. दिगंबर निकम, रणजित लेंभे, अमोल कांबळे, विक्रम निकम, हरेश चव्हाण, प्रविण कांबळे, अमित वाघांबरे, अक्षय कर्पे, अभिषेक नाचण, हरी शेरे, व ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!