दैनिक स्थैर्य | दि. 19 फेब्रुवारी 2024 | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार शशिकांत शिंदे यांच्यात फलटण येथे सुमारे एक तास कमरा बंद चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “लक्ष्मी विलास पॅलेस” या निवासस्थानी आमदार शशिकांत शिंदे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली असल्याची खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.
राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी विविध नाट्यमय घडामोडी घडत सत्ता स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरदचंद्र पवार यांची साथ सोडत अजितदादा पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत आहेत. तर आमदार शशिकांत शिंदे हे शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये कार्यरत आहेत.
फलटण येथे घेतलेल्या या भेटीमुळे आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकारणात काही वेगळे चित्र बघायला मिळणार का ? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.