पर्यटन संचालनालय वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी होणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा


दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दिनांक  7 ते 9 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट  2022 मध्ये  पर्यटन  विभाग सहभागी  होणार आहे. साहसी, कृषी, समृद्ध संस्कृती, वारसा  आणि वन्यजीव  पर्यटन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या लंडनमधील आघाडीच्या प्रवासी भागीदारांशी महाराष्ट्र शासनाचे  पर्यटन विभाग संवाद साधणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले, “राज्यात कृषी, सांस्कृतिक आणि साहसी पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे.  वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट -2022 च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत राज्यातील ही माहिती पोहचण्यास मदत होईल.  पर्यटन विभाग अधिक शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक पर्यटनाचा अवलंब करून पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे, याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहचेल,” असेही श्री.लोढा म्हणाले.

महाराष्ट्रात प्रवास करणे सुरक्षित :पर्यटन सचिव सौरभ विजय

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने अनेक महत्त्वपूर्ण  निर्णय घेतले आहेत.  कोविडनंतर, महाराष्ट्राने पर्यटनाच्या सर्व विभागांसाठी नियमावली  जारी केली आहे. निवास युनिट्स, ट्रॅव्हल कंपन्या, वाहतूक, टूर गाईड, पर्यटक, मनोरंजन आणि वॉटर पार्क यांचा यामध्ये समावेश आहे. भारत सरकारच्या (आदरातिथ्य उद्योगासाठी मूल्यमापन, जागरूकता आणि प्रशिक्षणासाठी प्रणाली) योजनेअंतर्गत, 400 पेक्षा अधिक हॉटेल्सनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात प्रवास करणे आणि राहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत वर्ल्ड ट्रव्हल्‍ मार्टच्या या माध्यमातून देता येईल असे पर्यटन सचिव सचिव सौरभ विजय यांनी  सांगितले. 

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा सहभाग

वर्ल्ड ट्रॅव्हलमार्ट मध्ये सहभागी होण्यासाठी  महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या  शिष्टमंडळामध्ये   पर्यटन मंत्री  मंगल प्रभात लोढा, पर्यटन सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीच्या एमडी श्रद्धा जोशी -शर्मा आणि सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर  यांचा सहभाग आहे.

महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची माहिती देण्यासाठी पर्यटन विभागाचा स्टॉल

राज्य पर्यटन संचालनालयतर्फे  पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले  व राज्यातील प्रवेशाचे ठिकाण गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती असलेला स्टॉल  उभारण्यात आला आहे.

या तीन दिवसांदरम्यान  हे शिष्टमंडळ प्रमुख टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट आणि मीडिया भागीदारांना भेटणार आहे. लंडन येथील पर्यटन, सांस्कृतिक आणि वारसास्थळे, उत्साहवर्धक साहसी अनुभव, विदेशी पाककृती, वाइन पर्यटन, कृषी पर्यटन यांसारख्या अनुभवांची  चर्चा आणि विचार जाणून घेणार आहेत.

महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी पंढरपूरची वारी, महाराष्ट्रातील विवाह समारंभ याचेही  सादरीकरण  यावेळी करण्यात येणार आहे .राज्याने नव्याने तयार केलेल्या डायमंड सर्किट- मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची वैशिष्ट्य माहितीपत्रक तसेच व्हिडीओ स्वरूपात येथे दाखवण्यात येतील. राज्याची समृद्धता  विविधता आणि वारसा याची माहिती होण्यासाठी या दरम्यान रोड शो देखील आयोजित करण्यात येणार आहे.

अजिंठा, एलोरा, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईतील आर्ट डेको इमारतींचे समूह आणि पश्चिम घाटाचा भाग म्हणून चार नैसर्गिक स्थळे यासारख्या प्रसिद्ध सहा जागतिक वारसा स्थळांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. त्यामुळे, युनिस्कोने  वारसा स्थळांचे नव्याने तयार केलेले 360 अंश व्हिडिओ देखील  येथे दाखवण्यात येतील.


Back to top button
Don`t copy text!