श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे दीपोत्सव उत्साहात


 

स्थैर्य, सातारा, दि.१५: दिवाळीची पहिली आंघोळ अर्थात नरक चतुर्थी दिवशी “एक दिवा शिवरायांच्या चरणी” या संकल्पनेची कास धरून आज श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे पहिला दीपोत्सव पहाटे पाच वाजता मशाली पेटवून करण्यात आला. परळी दऱ्याखोऱ्यातील सुमारे दोनशेहून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर दाखल झाले होते. भल्यापहाटे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार तसेच बुरुज तटबंदीला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत प्रेरणामंत्र, नाम जयघोष करून श्री अंगलाई देवी मंदिरापासून धाब्याचा मारुती, श्रीराम मंदिर, समाधी मंदिर, पेठेतील मारूती ते छत्रपती शिवाजी महाद्वारापर्यंत मशाली दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघा सज्जनगड दुमदुमून निघाला होता.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य स्थापनेसाठी सह्याद्रीच्या डोंगररांगावर असलेले सर्व गड किल्ले आपला इतिहास आपली संस्कृती स्वाभिमानाने व अभिमानाने जिवंत दिसून येत आहे आपण गड-किल्ल्यांची संख्या वाढवू शकत नसलो तरीही त्यांचे सौंदर्य संवर्धन वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आपल्या वाट्याला जितके गड-किल्ले आहेत ते पुढच्या पिढीला सुस्थितीत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे आवाहनही यावेळी जमलेल्या शिवभक्तांनी केले. यावेळी मावळ्यांनी दिलेल्या जय घोषणांनी संपूर्ण सज्जनगड दुमदुमून गेला होता तसेच दुर्ग संवर्धनाच्या अशाच काही मोहिमा भविष्यातही राबवणार असल्याचे दुर्गसंवर्धकानी यावेळी आवर्जून सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!