खिंडवाडीजवळ महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू


 

स्थैर्य, सातारा, दि.१५: पुणे-बंगळूर महामार्गावर, खिंडवाडीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे, साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड, वनरक्षक सुनील भोसले, धोंडवड यांनी पाहणी केली. वन विभागाच्या गोडोली येथील रोपवाटीकेत पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. दहन करून मृतदेह नष्ट करण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती अशी, औद्योगिक वसाहतीमधून कामावरून घरी निघालेल्या काही कामगारांना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यांनी वनविभागाला खबर दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सातारा तालुक्यातील शेंद्रे गावाजवळ हा अपघात झाला. साधारण अडीच वर्षे वयाचा हा नर बिबट्या आहे. बिबट्याच्या पायाच्या नख्या सुस्थितीत आहेत. डोक्याला जोराचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. लिंब ते खिंडवाडी ते शेंद्रेदरम्यान वाहन अपघातात मृत्युमुखी पडलेला हा गेल्या काही वर्षांतील तिसरा बिबट्या आहे. यापूर्वी महामार्गावर खिंडवाडी परिसरात महामार्ग ओलांडणाऱ्या दोन बिबट्यांना जीव गमवावे लागले आहेत. त्यातील एक काळा बिबट्या होता. चौकट: खिंडवाडीजवळ वाहनांच्या वेगावर नियंत्रण हवे महामार्गावर, खिंडवाडी ते शेंद्रेदरम्यान डोंगररांग आहे. महामार्ग ओलांडताना रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाशझोत पडून बिबट्याचे डोळे दिपतात. त्यामुळे अचानक महामार्गावर आलेला बिबट्या जागच्या जागी स्तब्ध होतो. वेगात असलेले वाहन अचानक थांबवता येत नसल्याने परिणामी बिबट्याचा बळी जातो. खिंडवाडी ते शेंद्रेदरम्यान महामार्गावरील वाहनांच्या वेगावर मर्यादा घालावी, अशी सूचना माजी वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!