श्रीराम कारखाना निवृत्त कामगारांचे तहसील कार्यालया बाहेर पहिली आंघोळ आंदोलन


 

स्थैर्य, फलटण, दि.१५: श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी ग्रॅच्युइटीसाठी ऐन दिवाळीत उपोषण सुरु केले आहे.कारखाना आणि प्रशासन लक्ष देत नसल्याचा निषेधार्थ आज तहसील कार्यालया बाहेर निवृत्त कामगारांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून कारखाना आणि प्रशासनाचा निषेध केला

फलटण तालुका संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष ॲड नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम कारखाण्याच्या निवृत्त कामगारांचे गॅच्युईटीसाठी आंदोलन करण्यात येत असून जोवर पैसे मिळणार नाहित तोवर आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हॅली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून सन २०१७ ते २०२० या सालात एकूण ६० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. या कामगारांची कारखान्याकडे व अर्कशाळेकडे सर्वाची मिळून अडीच ते तीन कोटी रुपये गॅच्युईटीची रक्कम थकीत आहे. त्याचप्रमाणे थकीत पगार व रजेचा पगार अशी येणे रक्कम आहे. वास्तविक पेमेंट ऑफ गॅच्युइटी अॅक्ट या कायद्यातील तरतुदीनुसार कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर पंधरा दिवसाचे आत संबंधीत संस्थेने गॅच्युइटीची रक्कम कामगारांना देणे बंधनकारक आहे. परंतु गेली तीन वर्ष कामगारांनी अनेकवेळा हेलपाटे मारुन सुध्दा कारखान्याने त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम अद्याप दिली नाही. कामगार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्न कार्यासाठी, वयोवृध्द वडीलांच्या औषध पाण्यासाठी, दैनंदिन गरजेसाठी तसेच कामगारांना सुध्दा स्वत:च्या औषधपाण्यासाठी या रकमेची अत्यंत आवश्यकता आहे. असे असताना कारखान्याचे व्यवस्थापन ही रक्कम बुडविण्याच्या प्रयत्नात आहे असा कामगारांचा आरोप आहे. या आधीही सन २०१२ ते सन २०१७ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी सलग २१ दिवस उपोषण होते, तेव्हा व्यवस्थापनाला ग्रॅच्युइटीची रक्कम देणे भाग पडले होते. गॅच्युइटीची रक्कम तसेच थकीत पगार, रजेचा पगार अशी एकूण सर्व कामगारांची मिळून अडीच ते तीन कोटी रुपये श्रीराम कारखाना व डिस्टलरीकडे आहेत. या रकमेसाठी कामगारांनी अनेकवेळा कारखान्याकडे व नेतृत्वाकडे हेलपाटे घातले. त्याचप्रमाणे कामगार आयुक्त यांचेकडेही तक्रार केली, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यामुळे हक्काचे पैसे मिळण्यासाठी कामगारांनी तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनास सुरुवात केली आहे.5 दिवस उलटूनही कारखाना किंवा प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त निवृत्त कामगारांनी आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून कारखाना आणि प्रशासनाचा निषेध केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!