दिगंबर आगवणे हे स्वत: ताकदवान; त्यांना दुसर्‍याच्या ताकदीची गरज नाही : विजयसिंह मोहिते पाटील


स्थैर्य, फलटण, दि.२५: दिगंबर आगवणे यांना कोणाच्याही ताकदीची गरज नाही. ते स्वतः ताकदवान नेतृत्त्व आहे. फलटण तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूका लढवण्यासाठी ते सक्षम आहेत, असे मत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

गिरवी, ता. फलटण येथील दिगंबर आगवणे यांच्या निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी युवा नेते दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्य सौ. जयश्री दिगंबर आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृष्णा – भीमा स्थिरीकरणाबाबत राज्य सरकार उदासीन
कृष्णा भीमा स्थिरीकरण करण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल असून राज्य सरकार मात्र उदासीन आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तातडीने कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पास मंजुरी दिलेली होती. परंतु विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पास निधी न देवून उदासीनता दाखवलेली आहे. आगामी काळामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी आम्ही तयार आहाते, असे ही विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.

फलटण व माळशिरस तालुक्यातील नीरा देवधर प्रकल्प होणे गरजेचे
गेल्या बर्‍याच वर्षापासून रखडलेला निरा देवधर प्रकल्प आगामी काळामध्ये लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. पूर्वीप्रमाणे कालवे न होता, आता बंदिस्त पाइपलाइनद्वारे नीरा देवधर प्रकल्पाचे काम होणार आहे. आगामी काळात नीरा देवधर प्रकल्प होणे हे फलटण व माळशिरस तालुक्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असेही विजयसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी नमूद केले.

केंद्र सरकार अर्धवट प्रकल्पांना निधी देवू शकत नाही
नीरा देवधर व कृष्णा भीमा स्थिरीकरण यासाठी केंद्र सरकार पातळीवरसुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत. परंतु केंद्र सरकार हे अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना निधी देऊ शकत नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये या प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधी मिळवणे गरजेचे आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेमध्ये याबाबत आवाज उठवला असून हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशी आग्रही भूमिका विधान परिषदेमध्ये त्यांनी मांडली असल्याचे, विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगीतले.

महावितरण बाबत रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही
सध्या राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना, शेतकर्‍यांना वाढीव लाईट बिले आकारण्यात आलेली आहेत. सदरची लाईट बिले कमी करून येत नाहीत, तोपर्यंत लाईट बिल भरू नये असे राज्यातील मंत्र्यांनी सांगितले होते. परंतु महावितरणचे अधिकारी हे मंत्र्यांच्या आदेशाला जुमानत नसून सक्तवसुली प्रमाणे बिले वसुलीचे काम संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना व शेतकर्‍यांना दिलासा मिळण्यासाठी महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असेही विजयसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी सांगीतले.


Back to top button
Don`t copy text!