ना. देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर; लोकसभेसाठी भाजपा ऍक्शन मोडवर


दैनिक स्थैर्य | दि. २३ मे २०२३ | फलटण | उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे आगामी काही दिवसांमध्ये फलटण दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपाने मिशन लोकसभा हाती घेतलेले आहे. याचाच भाग म्हणून गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्री व राज्यातील मंत्री हे सातारा जिल्ह्यामध्ये वारंवार येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा फडकण्यासाठी ना. देवेंद्र फडणवीस हे आता लोकसभा मतदारसंघात दौरे करीत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदार संघामधून गत लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर बहुमताने निवडून आलेले आहेत. आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारमधील व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी लक्ष घातलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे फलटणसह माण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सातारा जिल्ह्यामधील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ व माण – खटाव विधानसभा मतदारसंघ असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामधील फलटणला राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर माण विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणकोणत्या ठोस भूमिका घ्याव्या लागतील यासाठी आता भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या लोकसभेवर निवडून गेल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये हजारो नव्हे तर लाखो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे. ज्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद सैल होती; त्याच माढा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीची पकड आता घट्ट केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!