भीमा नदीवर एक टीएमसी साठवण क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


दैनिक स्थैर्य । दि.१६ जानेवारी २०२२ । पुणे ।  तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक टीएमसी साठवण क्षमतेचे तीन बॅरेजेस बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

चासकमान कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. पवना प्रकल्प तसेच भामा आसखेड प्रकल्पांचीही कालवे सल्लागार समितीच्या बैठकादेखील यावेळी पार पडल्या. त्यास पिंपरी- चिंचवडच्या महापौर माई ढोरे यासुद्धा उपस्थित होत्या.

चासकमान प्रकल्पातून सिंचनासाठी रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत झाला. पवना प्रकल्प तसेच भामा आसखेड प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा असून नियोजनाप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

चासकमान प्रकल्प :

चासकमान प्रकल्पात गतवर्षीपेक्षा सुमारे 3 टक्के अधिक पाणी आहे त्यामुळे रब्बीसाठी एक आणि उन्हाळी दोन आवर्तने देण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. कालव्यांची गळतीची ठिकाणे निश्चित करुन गळती काढण्याची कामे हाती घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

कालव्यावरील लोखंडी पूल खराब झाले असल्याने दुसऱ्या बाजूस वाहने घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अंतराचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे लोखंडी पुलांच्या बाजूला सिमेंटचे पूल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करुन सादर करावेत. त्यास निधीची तरतूद करण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंपदा विभागाचे मुख अभियंता एच.व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय चोपडे आदी उपस्थित होते.

पवना आणि भामा आसखेड प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा असल्याने सिंचनासाठी नदीत यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!