शिवाजीनगर येथील बाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि.०२: महामेट्रो व पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण व पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा व राजीव गांधीनगर येथील मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या तसेच सिद्धार्थनगर येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शिवाजीनगर कामगार पुतळा येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण व पुनर्वसन तात्काळ करणे आवश्यक आहे. तसेच येथील नवीन सदनिकांमध्ये विद्युत मीटर बसवून घेणे, झोपडीधारकांसोबत संबंधित यंत्रणांनी करारनामे करुन घेणे, विमाननगर येथील सदनिकांची किरकोळ कामे पुणे महापालिकेने करुन घेणे, आदी कार्यवाही गतीने करावी.

सिद्धार्थनगर येथील सुमारे 350 झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत पुणे महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त सौरभ राव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत सद्यस्थितीची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!