स्थैर्य, सातारा, दि.१४ : संगम माहुली येथील राजघाटावरील छत्रपती शाहू
महाराज (थोरले) यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या समाधीचा
लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. 15) सकाळी दहा वाजता कृष्णा-वेण्णा
नद्यांच्या संगमावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजमाता कल्पनाराजे भोसले
यांनी रविवारी समाधीच्या परिसराची पाहणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र
छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा शहरातील
रंगमहाल-राजवाडा येथे निधन झाले. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या संगम माहुली
येथील राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच त्यांचे
समाधीस्थळ उभारण्यात आले.
राजमाता कल्पनाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर 2018 मध्ये या
समाधीस्थळाच्या जीर्णोध्दाराचे काम लोकसहभागातून हाती घेण्यात आले होते.
अवघ्या 25 महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. मंगळवारी छत्रपती शाहू
(थोरले) महाराजांची 270 वी पुण्यतिथी असून याच दिवशी सकाळी दहा वाजता
राजमाता कल्पनाराजेंच्या हस्ते समाधीचे लोकार्पण होणार आहे. राजमातांनी
रविवारी या समाधीच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली. तसेच कामांबाबत
काही सूचनाही केल्या.
या परिसरात महाराणी ताराराणी व येसूबाई यांच्या समाधी आहेत. या
समाधींचाही जीर्णोध्दार करून त्यांचेही लोकार्पण केले जाणार आहे. त्यासाठी
आराखडा तयार करून या समाधींचेही काम हाती घेतले जाणार आहे. त्याबाबत
राजमातांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी अजय जाधवराव, राजू
राजपुरोहित, शशिकांत पवार, रोहित सावंत, विनित पाटील, पंकज चव्हाण आदी
उपस्थित होते.