दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२३ । पुणे । महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत तीन वर्षाचा पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा तसेच सद्यस्थितीत सुरु असलेला पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम बंद न करता पुढील दोन वर्षे सुरु ठेवण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत तीन वर्षाचा पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अतिरिक्त पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाअंतर्गत इयत्ता बारावी नंतर विज्ञान शाखेमध्ये जीवशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाचा पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सुरु असलेला पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचा मुंबई येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला लोकप्रतिनिधी व पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभुमीवर बैठकीत पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम बंद न करता पुढील दोन वर्षे सुरु ठेवण्यात येईल. पुढील दोन वर्षानंतर या अभ्यासक्रमाचा ‘पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम’ यामध्ये समावेश करण्याबाबत विचार करण्यात येईल. विद्यापिठाने इयता १२ वी नंतर या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, प्रयोगशाळा आदी तपासणी करावी.
राज्यातील वाढते पशुधन लक्षात घेता नवीन अभ्यासक्रमामुळे कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. सदरचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील धनगर समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे,असेही मंत्री मंत्री विखे-पाटील म्हणाले.
कुलगुरु डॉ. गडाख म्हणाले, विद्यापीठ स्तरावरुन गठीत करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. यामुळे दर्जेदार, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. सदरचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून विद्यापिठाच्यावतीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असेही डॉ. गडाख म्हणाले.
यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचार व्यकत करत सदरचा अभ्यासक्रम सुरु करण्यास सहमती दर्शवली आहे.