
स्थैर्य, पणजी, दि.२३: गोव्याचा समुद्र
किनारा आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. नेहमीच मोठ्या संख्येने लोक
गोव्याच्या किना-यावर फिरायला जातात. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर आता
अनेकजण गोव्याला जाण्याच्या विचारात असतील. पण समुद्र किना-यावर फिरणं आता
धोकादायक ठरू शकते. कारण गोव्याच्या बीचवर घातक, विषारी जेलीफिशने कहर केला
आहे. गेल्या काही दिवसात ९० लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. या विषारी
माश्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मंदिरांमध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवे नियम
मागच्या दोन दिवसात बागा कॅलंग्यूट बीचवर ५५ पेक्षा जास्त लोकांना
जेलीफिशने दंश केला आहे. कँडोलिम बीचवर या विषारी माश्याने १० लोकांना दंश
केला आहे. दक्षिण गोव्यात २५ पेक्षा जास्तवेळा अशा घटना घडल्या आहेत.
विषारी जेलीफिशने दंश केल्यानंतर लोकांना प्राथमिक उपचारांची आवश्यकता
असते.
जेलीफिशच्या संपर्कात आल्यानंतर शरीराला वेदना होतात तसंच शरीराच्या ज्या
भागावर जेली फिशने दंश केला आहे तो भाग सुन्न होतो. याव्यतिरिक्त या
माश्याच्या संपर्कात आल्याने काहीवेळासाठी त्वचेवर संवेदना जाणवत नाहीत.
बागा बीचवर ही दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली
होती. ऑक्सिजन लावल्यानंतर पिडीत व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
जेलीफीशने डंक मारल्यानंतर एका व्यक्तीच्या छातीत वेदना झाल्या नंतर श्वास
घ्यायला त्रास झाला.