दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२३ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वारजे माळवाडी, पुणेचा दत्तात्रय चोरमले ‘शिवाजीराजे करंडक’ चा मानकरी ठरला आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलीत मुधोजी महाविद्यालयात श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून युवा पिढीने आपले वक्तृत्व कौशल्य विकसित करून आपला स्वतंत्र ठसा निर्माण करावा. या स्पर्धेच्या विषयाच्या निमित्ताने स्थानिक भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील समस्यांविषयी विचारमंथन करावे. या वक्तृत्व स्पर्धेस दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असून युवा स्पंदनाला अभिव्यक्त होण्यासाठी हे एक मुक्त व्यासपीठ आहे याबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. यावेळी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. चंद्रकांत पाटील प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते .
या स्पर्धेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर स्पर्धेत कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी, पुणे येथील दत्तात्रय चोरमले याने प्रथम क्रमांक पटकावला व रोख रक्कम रुपये ५००० व ‘शिवाजीराजे करंडक- २०२३’ चा तो मानकरी ठरला.
बद्रिके विधी महाविद्यालय, पुणे येथील पराग राजेंद्र याने द्वितीय क्रमांक रोख रक्कम रुपये ३००० व करंडक तर श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणची साक्षी जाधव हिने तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम रुपये २००० व करंडक पटकवला. तसेच कु. कुंभार हिने उत्तेजनार्थ क्रमांकाचे रुपये १००० चे बक्षीस मिळविले.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी लालासाहेब नाईक निंबाळकर यांनी या स्पर्धेच्या करंडकासाठी उत्स्फूर्तपणे आर्थिक सहयोग दिला. सदर पारितोषिके वितरण समारंभ गव्हर्निंग कौन्सिल सदस्या नूतन शिंदे तसेच श्री. लालासाहेब नाईक निंबाळकर व प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते संपन्न झाला.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. सविता नाईक निंबाळकर, प्रा. डॉ. अशोक शिंदे, डॉ. ए. के. शिंदे, प्रा. विशाल गायकवाड, प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी, प्रा. प्रशांत शेट्ये, प्रा. सचिन दोशी, प्रा. यादव, प्रा. मठपती, स्वाती निंबाळकर व महेश कदम व ज्ञानेश्वर सस्ते या समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रा. वेळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. ए. के. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.