शिरुर तालुक्यातील ३२९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२३ । पुणे । जल जीवन अभियानांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि इतर १९ गावातील ३२९ कोटी ४५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्धघाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार अशोक पवार, उप विभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नंदू भोई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद तसेच संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, केंद्र शासन प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांचे जल जीवन अभियान राबवित आहे. याअंतर्गत महाराष्ट्रासाठी २० हजार कोटी रुपये तर पुणे जिल्ह्यासाठी २ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार  आहेत. शिरुर तालुक्यातील ३४ पाणी पुरवठा योजनेसाठी ५७१ कोटी ३८ लाख मिळाले आहेत.  ही कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी स्थानिकांनीही सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. शिरुर-हवेली-दौंड तालुक्यातील गावांना जोडणारा भीमा नदीवरील पूल उभारणीबाबतची मागणी लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. पुलाबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

लोकप्रतिनिधींनी स्थानिक विकासकामांसोबतच रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर केल्यास, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्याला प्राधान्य देऊ, ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

आमदार श्री. पवार म्हणाले, तालुक्यात जल जीवन अभियानांर्गत मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील समाधी स्थळाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

३२९ कोटी ४५ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन:

यावेळी तळेगाव ढमढेरे पाणीपुरवठा योजना- १३ कोटी ४ लाख, शिक्रापूर रेट्रोफीटिंग ७ कोटी २३ लाख, इनामगाव व तीन गावे प्रादेशिक ४१ कोटी १७ लाख, निमोणे ७ कोटी ३ लाख, कोरेगाव भीमा वाडा पुनर्वसन प्रादेशिक २२ कोटी ७६ लाख, आंबळे ७ कोटी २९ लाख, निर्वी ६ कोटी ३६ लाख, रांजणगाव सांडस १० कोटी ७३ लाख, सादलगाव वडगाव रासाई रेट्रोफिटिंग १४ कोटी, नांगरगाव आंदळगाव प्रादेशिक २४ कोटी ७ लाख, कोंढापुरी ९ कोटी ७ लाख, गुनाट १० कोटी १९, निमगाव म्हाळुंगी १३ कोटी ९३ लाख, वढू बुद्रुक ११ कोटी ७५ लाख, करडे १३ कोटी ४५ लाख, सणसवाडी ३२ कोटी १९ लाख, ढोक सांगवी  ४९ कोटी ७७ लाख, आलेगाव पागा १५ कोटी ६८ लाख, उरळगाव ७ कोटी ७३ लाख रुपये अशा पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन करण्यात आले.

विठ्ठलवाडी पाणीपुरवठा योजना ११ कोटी ११ लाख रुपये खर्चाची असून या योजनेत विठ्ठलवाडी गावासोबत डाळवस्ती, वेगरेवस्ती, महानुभावमळा, चोरमाळवस्ती, भोसेवस्ती, मधलामळा, शिंदेवस्ती या वस्त्यांच्या समावेश करण्यात आला आहे. या योजनेत ५ हजार २७८ नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!