गोंदवल्यात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी; जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण आदेश


स्थैर्य, गोंदवले, दि.७: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी टाळण्यासाठी गोंदवले बुद्रुक येथे प्रशासनाने येत्या गुरुवारी-शुक्रवारी संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी पहाटे श्रींच्या समाधीवर गुलाल फुलांची उधळण होणार आहे, तसेच गुरुवारी होणारा आठवडा बाजार देखील रद्द करण्यात आला आहे.

श्रींचा 107 वा पुण्यतिथी महोत्सव 31 डिसेंबर पासून समाधी मंदिरात सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी हा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शासनाच्या नियमावलीनुसार, सर्व खबरदारी घेऊनच नियोजित वेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येत आहे. तसेच पालखी मिरवणूक टाळून श्रींच्या पादुका वाहनातून श्रीराम भेटीसाठी नेण्यात येत आहेत. या महोत्सवाच्या मुख्य गुलालाच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी पहाटे भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुरुवारी व शुक्रवारी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

याच अनुषंगाने प्रशासनाने देखील खबरदारी म्हणून गोंदवल्यात येत्या आज मध्यरात्रीपासून शुक्रवार मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता गावातील इतर सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार बी. एस. माने यांनी दिली. तसेच गुरुवारी होणारा आठवडा बाजार देखील रद्द करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदवल्यातील यात्रा रद्द करण्यात आली आहे. या महोत्सवाच्या मुख्य दिवशी संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.


Back to top button
Don`t copy text!