
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, विसापूर, दि.७: मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांमध्ये खटाव तालुक्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवेळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील शेतकरी कधी ढगाळ वातावरण, कधी गारटा तर कधी पाऊस अनुभवत आहेत. त्यामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आला असून, या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आल्याचे चित्र आहे.
रब्बी हंगामातील गहू पिकाला पावसाचा फायदा असला, तरी धुकदेखील पडत असल्याने गव्हावर नुकसानकारक तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तर हरभऱ्यावर घाटेअळी पडायला सुरवात झाली आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे नगदी पिके असलेल्या कांदा व बटाटा पिकांवर विपरित परिणाम होत आहेत, तर बहुतांशी भाजीपाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसल्याचे चित्र तालुक्यात आहे.
खरेतर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या मुसळधारेने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच आता अचानक सुरू झालेल्या या अवेळी पावसाने रब्बीतही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढल्याने नगदी पिकांसाठी पोषण वातावरण तयार होत होते. पिके चांगली वाढून खरीप हंगामाची नुकसान भरपाई वसूल होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून येथील वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून, त्यात रब्बीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. परिणामी वेगवेगळ्या संकटांतून सावरताना शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
